पालकांसाठी महत्त्वाचे

सर्वच पालक आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी झटत असतात. मुलांच्या इच्छा-आकांक्षा तसेच त्यांचे उ शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई-वडील अहोरात्र कष्ट करत असतात. मात्र काही पालक स्वतःच्या इच्छा आकांक्षा मुलांवर लादत असतात. आपण जे करू शकलो नाही ते मुलांनी करावे असा त्यांचा अट्टाहास असतो. आजकाल तर मुलांनी परिक्षेतही चांगले मिळवायला हवेत आणि एखाद्या नृत्यस्पर्धेत किंवा गायनस्पर्धेत किंवा अशाच इतर स्पर्धांमधूनही यश मिळवायला हवे असे पालकांना वाटते. आपल्या मुलांची तुलना सतत इतरांच्या मुलांबरोबर केली जाते व आपल्या मुलाने इतरांपेक्षा जास्त यश मिळवायला हवे यासाठी मुलांवर दबाव टाकला जातो. यामुळे खरंतर मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. आपण इतरांपेक्षा सर्वच क्षेत्रात कमी आहोत असे मुलांना वाटू लागते. ते आपला आत्मविश्वास गमावून बसतात. त्यांच्या मनात भिती साठू लागते. यातूनच परिक्षेत मार्क कमी पडले किंवा नापास झालो तर आई-वडील रागावतील, मारतील म्हणून मुले आत्महत्या करतात. परिक्षेत चांगले मार्क पडले तरच आपला मुलगा भविष्यात यशस्वी होईल असे नाही. मुलाला परिक्षेत मार्क कमी पडत असतील तर इतर कोणते कलागुण आपल्या मुलांमध्ये आहेत याकडे लक्ष द्या व त्यानुसार त्याच्या कलागुणांना वाव मिळेल यासाठी प्रयत्न करा. कदाचित इतरांपेक्षा तो कमी पैसे मिळवेल परंतु आवडत्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे सुखी जीवन तो जगेल. मुले सुखी रहावीत हेच तर आपल्याला हवे असते. मात्र हे करत असताना समजा तुमचा मुलगा त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी झाला नाही तर त्याला दोष देऊ नका उलट त्याच्या मनात नेहमीच एक विश्वास निर्माण करा की 'बाळा, जरी तुझा एखादा निर्णय चुकला, फार मोठ्या अपयशाला तुला सामोरे जावे लागले तरी काळजी करू नको, तुला सावरायला सतत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत'. हा मानसिक आधार जर तुम्ही आपल्या मुलांना दिलात तर नक्कीच ते आपल्या आयुष्यात यशस्वी होतील. मुलांवर दबाव टाकण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करा म्हणजेच त्यांचे आयुष्य खुलेल.

            आणखी एक गोष्ट मी पालकांना सांगू इच्छितो की बरेच पालक ' तू फक्त अभ्यास करून चांगले मार्क मिळव, बाकी सगळी कामे आम्ही करतो', 'हे काम तुला जमणार नाही, माझं मी करतो' असे म्हणत मुलांवर कोणतीही जबाबदारी टाकत नाहीत. पण यामुळे मुलांना व्यावहारिक ज्ञान काहीच मिळत नाही. ते मानसिकरित्या दुबळे बनत जातात. एखादी जबाबदारी स्विकारण्याची किंवा एखादे काम स्वतःहून करण्याची त्यांची मानसिकता बनत नाही. सतत त्यांना कुणाच्या तरी मदतीची आवश्यकता भासते. म्हणूनच लहानपणापासूनच त्यांना बारीकसारीक कामे सांगत जा. स्वतःची कामे तसेच घरातील छोट्यामोठ्या जबाबदार्‍या त्यांना स्वतः पार पाडायला सांगा. तुम्ही फक्त आवश्यक ते मार्गदर्शन करा. जर त्यांच्या हातून काही चूक घडली तर ओरडू नका. त्यांना समजावून सांगा. ते चुक़ा करतात म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्याचे बंद करू नका. तरच तो भविष्यकाळात कोणतीही जबाबदारी पेलण्यास सक्षम बनेल.

खरे मार्गदर्शक

आयुष्यात घडणा-या घटना याच ख-या मार्गदर्शक / संकेत ओळखायला शिका.तुमचा नशिबावर विश्वास नसला तरी तुम्हांला हे मान्य करावे लागेल की आपल्या आयुष्यात लहान मोठ्या अशा अनेक घटना घडतात की ज्यामुळे आपल्या आयुष्याला एक कलाटणी मिळते. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या या गोष्टी असतात. आपण काही न करताही त्या घटना आपल्या आयुष्यात घडतात व आपल्या आयुष्यावर परिणामही करतात. याचे कारण 'क्रिया आणि प्रतिक्रिया',  'कॅरम बोर्ड थेअरी' या विभागांत तुम्हांला सापडेल. म्हणूनच या घटनांकडे तुम्ही वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले तर या घटनाच तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. त्यासाठी या घटनांमागील संकेत तुम्ही ओळखले पाहिजे. अनेकवेळा आपण एखाद्या कामासाठी निघत असताना एखादा विचार आपल्या डोक्यात चमकून जातो किंवा एखादी शंका मनात डोकावून जाते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा कामात काही समस्या निर्माण होतात त्यावेळी आपण म्हणतो हा विचार, ही शंका माझ्या मनात डोकावून गेली होती पण मी दुर्लक्ष केलं. म्हणूनच एखादा विचार किंवा शंका मनात आली तर क्षणभर विचार करा खरंच तसं झालं तर आपण काय करू शकतो किंवा तसे होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी. त्यातूनही समजा आज एखाद्या चुकीमुळे तुमचे दहा हजार रूपयांचे नुकसान झाले असेल तर दुःख करत बसू नका. स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसू नका. भविष्यामध्ये तुमचे यापेक्षाही अधिक रकमेचे नुकसान होऊ नये म्हणून सावध राहण्याचा संकेत येथे दिला गेलेला आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच झालेले दहा हजार रूपयांचे नुकसान कशामुळे झाले व भविष्यात आपण यासंबंधीची कोणती खबरदारी घ्यावी याचा विचार करा. छोट्या अपयशांमागची कारणे शोधून झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी तुम्ही घेत गेलात, तशी सवय तुम्ही स्वतःला लावून घेतली तर मोठ्या अपयशांपासून तुम्ही वाचू शकता.

याचबरोबर आपल्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा एक पॅटर्न ठरलेला असतो. वर्तमानात घडलेल्या एखाद्या घटनेशी साम्य असणारी घटना भूतकाळात घडलेली असते. भलेही ती आपल्या आयुष्यात घडलेली नसेल, आपल्या मित्राच्या आयुष्यात घडलेली असेल किंवा वर्तमानपत्रात वाचलेली असेल, पण या दोन्ही घटनांमध्ये पूर्ण नसले तरी बर्‍याच प्रमाणात साम्य असते. अशावेळी पूर्वी घडलेल्या त्या घटनांच्या संदर्भाने योग्य ती खबरदारी घ्या. पूर्र्वी झालं होतं म्हणून पुन्हा तसंच होईल कशावरून?, ती घटना माझ्याबाबतीत घडली नव्हती तर मित्राच्या किंवा इतर कोणाच्या तरी आयुष्यात घडली होती, माझ्याबाबतीत तसे होणार नाही असे म्हणून दुर्लक्ष करू नका. सावध रहा. योग्य ती खबरदारी घ्या.

            उदाहरणार्थ, समजा तुम्ही एक कंपनी सोडून दुसर्‍या कंपनीत नोकरीला लागलात. नव्या कंपनीत असा एक सहकारी आहे की त्याला पाहून किंवा त्याच्या वागण्या-बोलण्यातून तुम्हांला जुन्या कंपनीतील एखाद्या सहकार्‍याची आठवण येत असेल. याचे वागणे बोलणे अगदी त्याच्यासारखेच आहे असे तुम्हांला वाटत असेल तर विचार करा की त्या जुन्या सहकार्‍यामुळे तुमचे नुकसान तर झालेले नाही ना? त्याने तुमचा विश्वासघात तर केलेला नाही ना? जर जुन्या सहकार्‍याविषयी तुमचा वाईट अनुभव असेल तर त्या नव्या सहकार्‍याशी वागताना योग्य ती खबरदारी तुम्ही घ्यायला हवी. त्याने विश्वासघात केला म्हणून हाही करेल असे नाही, सगळेच लोक काही सारखे नसतात. असे म्हणून दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ नविन सहकारी जुन्या सहकार्‍याप्रमाणेच वागेल असे १०० % सांगता येत नसले तरीही योग्य ती खबरदारी घेणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वच ठिकाणी हा नियम लागू करून सावधपणे वागा. एक छोटीशी चूक, निष्काळजीपणा तुमच्या अपयशाला कारणीभूत ठरू शकतो.

            आजकाल रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याचे गांभीर्य लक्षात ठेवून रहदारीचे नियम पाळणे, आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या रोजच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर नेहमी अपघात होत असतील तर अपघाताची नेमकी ठिकाणे कोणती याकडे लक्ष द्या. या ठिकाणांमध्ये काही साम्य आहे का, ते अपघात क्षेत्र आहे का याकडे लक्ष ठेवून अशा ठिकाणी जास्त सावधगिरीने वाहन चालवावे.

            अशाप्रकारे आपल्या अवतीभोवतीने मिळणारे मार्गदर्शन, संकेत, पॅटर्न यांकडे लक्ष द्या व योग्य ती सावधगिरी बाळगा. अशी सावधगिरी बाळगतानाही त्यात सातत्य हवे. एखाद्यावेळचा निष्काळजीपणाही नुकसानकारक ठरू शकतो.

नशीबात असते तेच होते

या पुस्तकाच्या सुरूवातीलाच मी नशिबासंबंधीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तो मुद्दा मी अपूर्ण ठेवला होता. तोच याठिकाणी मी पूर्ण करणार आहे. अर्थातच ज्यांचा नशिबावर विश्वास आहे त्यांच्यासाठीच मी हे सांगत आहे. नशिबावरील विश्वासाचाच आधार घेऊन आपण चिंतामुक्तीकडे आणि यशाकडे कशी वाटचाल करू शकतो हे पाहूया.


मी एखाद्याला जेव्हा म्हणतो की नशिबात असते तेच होते तेव्हा ते म्हणतात की म्हणजे आपण काही करायलाच नको. माझ्या नशिबात लिहिलेले असेल की परिक्षेत माझा पहिला नंबर येणार आहे तर तो येईलच की मी अभ्यास कशाला करायला पाहिजे. अशावेळी मी उत्तर देतो की जर तुमच्या नशिबात पहिला नंबर असेल तर तुम्ही निवांत बसूच शकत नाही. त्यासाठी आवश्यक ती तयारी तुमच्या हातून घडतेच. तुम्ही तुमचा भूतकाळ आठवून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती घटना घडण्यासाठी आवश्यक गोष्टी, कामे एकापाठोपाठ घडत जातात. कधी या गोष्टी कळत नकळत तुमच्या हातून घडतात तर कधी इतरांकडून त्या घडतात. म्हणजेच बर्‍याचवेळेला या गोष्टी आपल्या नियंत्रणापलिकडे असतात तर कधी त्या अज्ञानाने आपल्याकडून घडतात. घडलेल्या सर्व गोष्टींचा क्रम लक्षात घेतला तर असे वाटते की हे सर्व पूर्वनियोजित तर नव्हते? कोणती तरी अज्ञात शक्ती हे सर्व घडवत तर नव्हती ना? यालाच आपण नशीब म्हणतो.

आता या नशिबाचा वापर करून चिंतामुक्ती कशी साधायची हे पाहू. त्यासाठी तुम्हांला तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.

१) तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तो १०० % ठेवा. मिळालेले अपयशही नशिबामुळे मिळते आणि मिळालेले यशही नशिबामुळेच मिळते हे मनात पक्के करा.

२) नशिबात लिहिल्याप्रमाणे तुम्हांला एखाद्या कामात यश मिळणार असेल तर इतर कोणी कितीही विरोध करू दे, कितीही अडचणी येऊ देत, तुम्हांला यश मिळणारच. यश मिळण्यासाठी तुमचे प्रयत्न जर अपुरे पडत असतील तर दुसरी व्यक्ती येऊन तुम्हांला मदत करेल व तुमचे काम पूर्ण होईल.

३) नशिबात लिहिल्याप्रमाणे तुमचे एखादे काम होणार नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा ते काम पूर्ण होणार नाहीच. तुम्हांला अपेक्षित यश मिळणार नाहीच.

हे तीन मुद्दे लक्षात ठेवा आणि हातात घेतलेले काम पूर्ण होईल की नाही, अपेक्षित यश मिळेल की नाही याची चिंता करत बसू नका. मनात कोणतीही भिती बाळगू नका. यश मिळाले तर आनंदाने हुरळून जाऊ नका. त्या गोष्टीचा गर्व करू नका. अपयश मिळाले तर खचून जाऊन नका. रडत बसू नका. स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसू नका. यश अपयश, चांगल्या-वाईट गोष्टी हे सर्व नशिबात लिहिल्याप्रमाणेच मिळालेले आहे. आपण केवळ माध्यम आहोत. जे घडले ते कोणत्याही परिस्थितीत असेच घडणार होते. आपण किंवा इतर कोणी त्यात बदल करू शकलो नसतो हे लक्षात ठेवा. सर्वच गोष्टींची जबाबदारी नशिबावर टाकल्यामुळे तुम्ही आनंद-दुःख, चिंता-भिती, गर्व अशा मानसिक द्वंद्वातून मुक्त व्हाल. तुम्हांला हलके हलके वाटू लागेल. तुम्हांला मानसिक थकवा जाणवणार नाही. तुम्ही तुमचे काम निर्धास्तपणे करू लागाल. अपयश मिळाले तर ते पचवून पुन्हा पुढच्या कामास सुरूवात करू शकाल.

तुम्ही जेव्हा एखाद्या जत्रेत जाता तेथे अनेक प्रकारचे खेळ असतात. समोर अनेक वस्तू मांडलेल्या असतात. तुम्ही रिंग फेकायची असते. जी वस्तू त्या रिंगमध्ये व्यवस्थित अडकेल ती वस्तू तुम्हांला मिळेल असे सांगण्यात येते. क्वचितच आपल्याला बक्षिस मिळते पण जरी आपल्याला बक्षिस मिळाले नाही, आपण अपयशी ठरलो तरी तो खेळ आपण 'एन्जॉय' केलेला असतो. एक खेळ खेळून झाल्यावर आपण पुढच्या दुकानात जाऊन दुसरा खेळ खेळू लागतो. खेळलेले सर्व खेळ जरी आपण हरलो तरी जत्रेतून बाहेर पडताना आपण आनंदाने बाहेर पडत असतो. आता आपल्याला असाच खेळ आपल्या नशिबाबरोबर खेळायचा आहे. एखादे असे काम शोधून काढा की ते काम आपल्याकडून पूर्ण होईल की नाही, आपल्याला अपयश तर येणार नाही ना, हे काम करताना खूप अडचणी येतील अशा अनेक शंका-कुशंकांमुळे, भीतीमुळे तुम्ही बाजूला ठेवले आहे. अशा कामाची सुरूवात तुम्हांला आज करायची आहे. या कामात यश मिळेल की अपयश हे तुम्हांला पाहायचे आहे अगदी तसेच जसे जत्रेत तुम्ही खेळून पाहता. तुम्ही एक व्यक्ती आणि नशिब हे तुमच्यासमोरील दुसरी व्यक्ती असे समजून त्याच्याशी तुम्हांला खेळायचे आहे. त्यासाठी अर्थातच सुरूवातीला छोटी छोटी, जास्त नुकसान होणार नाही अशी कामे निवडा. 'बघुया हे काम करून, यात यश मिळते का' असा सहजसोपा विचार करा. या प्रयोगासाठी वर दिलेले तीन महत्त्वाचे मुद्दे मात्र विसरू नका.